Friday, November 2, 2007

"सी-फूड'चा शौकीन


ग्रॅंडमास्टर अभिजित कुंटे याच्या मुलाखतीवर आधारित लेख इथे देत आहे. तुमच्या प्रतिक्रिया अवश्‍य कळवा.
----------------------

""वेगवेगळ्या कारणांनी सहा-सहा महिने घराबाहेर राहावं लागत असल्यानं खाण्याबाबत फार काही आवडी-निवडी ठेवून चालत नाही. उलट, जे समोर येईल ते आवडीनं खावं लागतं. त्यातही कोळंबी आणि माशांचे पदार्थ मिळाले तर जेवायला मजा येते...'' बुद्धिबळातील चौसष्ट घरांचा "राजा' ग्रॅंडमास्टर अभिजित कुंटेने स्वतःच्या आवडी-निवडींचा "पट' मांडला. शाकाहारी पदार्थांपेक्षा मांसाहारी पदार्थच अभिजितला विशेष प्रिय. त्यामध्ये झिंगे, कोळंबी, पापलेट अशा सागरी खाद्यपदार्थांचा समावेश. एरंडवण्यातील "निसर्ग' रेस्तरॉंमध्ये हे पदार्थ खाण्यासाठी वरचेवर जाणं होत असल्याचंही तो सांगतो.

बुद्धिबळात कोणतीही चाल खेळण्यापूर्वी विचार करणाऱ्या अभिजितला खाण्याबद्दल बोलताना फारसा विचार करावा लागत नाही. एकामागून एक आवडीचे पदार्थ तो सांगत जातो. घरात आईनं केलेली पुरणपोळी हा त्याचा आवडता पदार्थ. तशी पुरणपोळी कोणीही केली असली तरी त्याला आवडतेच; पण आईनं केलेली असेल तर त्याच्यासाठी दुधात केशरच! बायकोनं केलेला कोणता पदार्थ आवडतो, असं विचारलं, तर सगळंच आवडतं, असं सांगून ती डोसा फारच छान करते, असं तो सांगतो. स्वतःवर काही करण्याची वेळ आलीच, तर "मॅगी' करून खायला त्याला आवडते. दुसरं काहीच तयार करता येत नसल्यानं एवढा एकच पर्याय त्याच्यासाठी उपलब्ध असतो.

"वीकएण्ड'ला खाण्यानिमित्त बाहेर जाण्याची अभिजितला मनापासून आवड. पुण्यात असेल तर त्याची पहिली पसंती असते फर्ग्युसन रस्त्यावरील "वैशाली'ला. त्याच्या मते तिथला "ऍम्बियन्स' खूपच छान. महाविद्यालयात असल्यापासून त्याला "वैशाली'त जाण्याची सवय आहे. तिथला उडीदवडा-सांबार हा त्याचा सर्वाधिक आवडता पदार्थ. वेगवेगळे देश फिरून आलेल्या अभिजितचे भारताबाहेरही खाण्याचे खास "अड्डे' आहेत. झेक प्रजासत्ताकमधील पारडुबिस शहरात मिळणारा "चीज ब्रोकोली' आणि सिडनीमधील "स्क्विड्‌स' हे त्याचे आवडते पदार्थ. पाश्‍चात्त्य देशांमध्ये मसाल्याचा वापर खूप कमी असतो. त्यामुळे सुरवातीला तिथले पदार्थ नकोसे वाटतात. पण एकदा सवय झाली, की ते पदार्थही आपण आवडीने खाऊ लागतो, असा अभिजितचा अनुभव.