Monday, April 4, 2011

व्यक्त व्हा, पण जरा जपून...!

व्यक्त होण्याची संधी सोशल नेटवर्किंगमुळे प्रत्येकाला मिळाली. वैयक्तिक आयुष्यातील अनुभव मांडण्यासाठी फेसबुक, ट्विटर, ऑर्कुट इत्यादी संकेतस्थळे हक्काची व्यासपीठ बनली. मात्र, कोणतेही विधान करताना त्याच्या परिणामांचा विचार प्रत्येकानेच केला पाहिजे. माध्यम हातात आले म्हणून ते बेपर्वाईने वापरणे कधीही धोकादायक ठरते. शिवाय वैयक्तिक आयुष्यातील कोणता अनुभव उघड करायचा आणि कोणता स्वतःपुरता मर्यादित ठेवायचा, याचेही भान ज्याने त्याने ठेवले पाहिजे. तसे नाही केले, तर विपरीत परिणामांना सामोरे जाण्याची वेळ कोणावरही येऊ शकते.

फेसबुकवर ज्येष्ठ ज्यू नागरिकाबद्दल अवमानकारक मजकूर प्रसिद्ध केल्यामुळे एका कर्मचाऱ्याला नोकरीला मुकावे लागले. दक्षिण आफ्रिकेमध्ये नुकतीच ही घटना घडली. अवघ्या एक-दोन वाक्‍यांचे विधान करून एखाद्याची बदनामी करण्याचे सोशल नेटवर्किंग हे खरंतर माध्यम नव्हे. कोणत्याही संस्थेत काम करताना समोरच्या व्यक्तीचा कितीही राग आला, तरी त्याचे असे जाहीरपणे प्रकटीकरण निश्‍चितच चुकीचे ठरते. कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाबद्दल, वरिष्ठांबद्दल अवमानकारक मजकूर सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवर प्रसिद्ध केल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करता येईल, असे दक्षिण आफ्रिकेतील कायदा सल्लागार जोहान बोट्‌स यांनी म्हटले आहे. कर्मचाऱ्यांनी जरीही कार्यालयाबाहेरून एखादी प्रतिक्रिया संकेतस्थळावर प्रसिद्ध केली, तरी तो त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे, असे म्हणता येणार नाही. यामध्ये संबंधित कर्मचाऱ्याने कार्यालयातील संगणकाचा वापर केला आहे की घरातील संगणकाचा, यापेक्षा त्याने केलेल्या विधानाचे होणारे परिणाम जास्त महत्त्वाचे आहेत. त्याच वेळी कोणत्याही सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर कोणतेही विधान प्रसिद्ध केल्यानंतर ते कोणा एकाचे राहत नाही. त्या विधानाचा वेगवेगळा अर्थ लावला जाऊ शकतो. त्याचबरोबर तो अनावश्‍यकपणे कोणत्याही व्यक्तीपर्यंत पोचू शकतो, याचा विचार केला पाहिजे, असे बोट्‌स यांचे मत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी एक सोप्पा उपाय सुचविला आहे. सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर कोणतेही विधान किंवा प्रतिक्रिया प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रत्येकाने एका गोष्टीचा विचार केला पाहिजे. दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये तुम्हाला तो मजकूर प्रसिद्ध झालेला आवडेल का? जर याचे उत्तर नकारार्थी असेल, तर तसे विधान फेसबुक किंवा ऑर्कुटवर अजिबात प्रसिद्ध करू नका, असे बोट्‌स यांना वाटते.

केवळ कंपनी आणि कर्मचारी एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित नाही. परिचयात येणाऱ्या विविध व्यक्तींबद्दल आपल्या मनात काही ग्रह असतात. त्यातूनच एखादी व्यक्ती जवळची वाटू लागते तर एखाद्याचा कायमच तिटकारा येतो. पुढे एकमेकांवर टीका सुरू होते. या टीकेला फेसबुक, ट्विटरचे व्यासपीठ मिळता कामा नये, याची जबाबदारी आपल्यावरच आहे.