Thursday, September 22, 2011

वांजळे वहिनी, तुमचा निर्णय चुकलाच...

खडकवासला विधानसभा मतदारसघातून राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची पत्नी हर्षदा वांजळे यांनी घेतलाच. गेल्या पंधरा दिवसांपासून त्या राष्ट्रवादीकडूनच निवडणूक लढविणार, याची कुणकुण लागली होती. त्यावर गुरुवारी केवळ अधिकृत शिक्कमोर्तब झाले. याच मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणताही उमेदवार उभा करणार नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगून टाकले. तीच रमेशभाऊंना खरी श्रद्धांजली असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय.

रमेश वांजळे यांच्या आकस्मिक निधनानंतर खडकवासल्याची निवडणूक राजकीय वर्तुळात चर्चेत आली. आधीपासूनच राजकारणात सक्रीय असल्याने वांजळे वहिनी याच ही निवडणूक लढविणार, हे नक्कीच होते. प्रश्न होता तो फक्त त्या कोणत्या पक्षाकडून विधानसभेची पायरी चढणार याचा. राज्यात सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीला साथ देऊन स्वतःच्या पदरात काय काय पाडून घेता येईल, याची समीकरणे त्या आखणार की ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाऊंना राज्याच्या राजकीय पटलावर आणले त्यांचाच बरोबर राहून त्यांचा वारसा पुढे चालवणार याचा. राष्ट्रवादीची साथ घेताना वांजळे वहिनींनी राजकीय डावपेचांचा पुरेपूर वापर केला. खरंतर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय त्यांनी खूप आधीच घेतला असणार. मात्र, यातील कोणतीच माहिती त्यांनी आपल्या तोंडातून बाहेर येऊ दिली नाही. कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊन त्यानंतरच निर्णय घेऊ, असे त्या सांगत होत्या. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे भाऊंना गुरुस्थानी होते. त्यामुळे ते आपल्याला आजही गुरुस्थानी आहेत, असे म्हणत म्हणत वेळ आल्यावर त्यांनी या दोघांना पद्धतशीरपणे कात्रजचा घाट दाखवत राष्ट्रवादीची साथ स्वीकारली. आता राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्या खडकवासल्यातून निवडूनही येतील. वांजळे यांच्या अकाली एक्झिटमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा त्यांना मिळेल. शिवाय निवडणुकीत त्यांना तोड देईल, असा कोणताच उमेदवार अजूनतरी रिंगणात उतरलेला नाही. निवडून आल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर आधीच झालेल्या डिलप्रमाणे त्यांना राज्यात एखादे राज्यमंत्रीपद वगैरे मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. रमेश वांजळे यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेण्यात वांजळे वहिनी यशस्वी झाल्यात. आतापर्यंत कॉंग्रेसच्या जिवावर जिल्हा परिषदेत केलेल्या राजकारणाचा त्यांनी यानिमित्ताने अगदी परफेक्ट वापर करून घेतला आणि सत्तेच्या पुढे पक्ष, विचार, बांधिलकी अगदीच गौण ठरते, हे त्यांनी आपल्या कृतीतूनच दाखवून दिले

२००९ मधील विधानसभा निवडणुकीत रमेश वांजळे प्रसिद्धीच्या झोतात आले ते त्यांची शरीरयष्टी, अंगावरील सोन्याचे दागिने आणि त्यांच्या डायलॉगबाजीमुळे. मै दिखता व्हिलन जैसा हूं, लेकीन काम करता हूं हिरो जैसा, हा त्यांचा डायलॉग आजही त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारसंघातील नागरिकांमध्ये फेमस आहे. कॉंग्रेसमध्ये असल्याने वांजळे यांना राष्ट्रवादीने तिकिट नाकारले होते आणि आपल्या पक्षातील विकास दांगट यांना उमेदवारी दिली होती. वांजळे यांच्याबद्दल त्यावेळी अजित पवार किंवा सुप्रिया सुळे यांना कोणतेही विशेष प्रेम नव्हते. यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्यावर तिकीट देण्यासाठी विश्वास दाखवला आणि अपक्ष म्हणून उभे राहण्यापेक्षा एका पक्षाची साथ वांजळे यांना मिळाली. राज ठाकरे यांनी दाखविलेल्या विश्वासाला वांजळेंनी सार्थ करून दाखवले. अर्थात प्रचाराच्या १२-१५ दिवसांच्या काळात रातोरात त्यांनी कोणताच चमत्कार केला नाही. विधानसभा निवडणुकीची तयारी वांजळे यांनी खूप आधीपासूनच केली होती. मतदारसंघात त्यांचा व्यापक जनसंपर्क होता. जवळपास प्रत्येक मतदाराचे जन्मतारखेपासून मोबाईल क्रमांकापर्यंतची विविध माहिती त्यांनी जमवून ठेवली होती. त्याचा त्यांनी योग्यवेळी वापर केला आणि विजयश्री खेचून आणली. कॉंग्रेसच्या कुशीत वाढलेल्या वांजळेंनी मनसेकडून निवडणूक लढविल्यावर मनापासून त्या पक्षाचा स्वीकार केला होता. त्याचे दर्शन विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात सदस्यांच्या शपथ घेण्याच्या कार्यक्रमावेळी सगळ्यांना झाले. पुढेही मनसे स्टाईलने त्यांनी मतदारसंघात आणि विधानसभेत अनेकांना आपला इंगा दाखवलाच. आता तो सगळा इतिहास झालाय, हे खरंच.

अगदी दोन वर्षांपूर्वी ज्यांच्यावर विश्वास ठेवायला अजित पवारांनी नकार दिला होता. आज त्यांच्याच पत्नीला पक्षाच्या तिकिटाची गळ घालण्यात ते यशस्वी ठरलेत. आता यासाठी दबावतंत्र की लोभतंत्र यापैकी कशाचा वापर केला गेला ते नजीकच्या भविष्यात स्पष्ट होईलच. तरीही एक गोष्ट पक्की की राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा वांजळे वहिनींचा प्रकार म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखेच आहे. कॉंग्रेसकडून जिल्हा परिषदेचे सदस्यत्व स्वीकारले असताना मनसेला झुलवत ठेवून राष्ट्रवादीबरोबर सोयरीक करण्याची त्यांची चाल निवडणुकीच्या निकालात जरी यशस्वी ठरली. तरी दूरगामी विचार केला तर ती अपयशी ठरेल, हे नक्की. त्यामुळेच रमेशभाऊंना दोन वर्षांपूर्वी मत देणारा खडकवासल्यातील प्रत्येक मतदार आज मनात हेच म्हणत असेल की वांजळे वहिनी तुमचा निर्णय चुकलाच, तुम्ही नीट विचार करायला हवा होता...