Wednesday, October 10, 2007

आपण बदललो आहोत...

परवा संध्याकाळी एका कार्यक्रमाला गेलो होतो. सध्याच्या माध्यमांवर भाष्य करणारा कार्यक्रम असल्यानं त्याला पुणेकारांचा प्रतिसादही मोठा होता. पत्रकारितेत काम करणारी आणि या क्षेत्रात येऊ घातलेली पिढी आवर्जुन कार्यक्रमाला उपस्थित होती. अपेक्षेप्रमाणं कार्यक्रम रंगतदार झाला. प्रथेप्रमाणं काही पुणेकरांनी आवश्‍यक आणि अनावश्‍यक प्रश्‍नही विचारले. कार्यक्रमाचा शेवट पसायदानानं होणार असल्याचं आयोजकांनी आधीच जाहीर केलं होतं. त्याप्रमाणं प्रश्‍नोत्तरे आटोपल्यानंतर पसायदान सुरू झाले. सभागृहात उपस्थित असलेले सर्वजण प्रथेप्रमाणं उभे राहिले. मी ही उभा होतोच. तसं पसायदान माझ्यासाठी नवं नाही पण त्यादिवशी ते ऐकताना अचानक अंगावर काटा आला आणि लगेचच हे असं का होतंय, असा विचार मनात घोळू लागला.

शाळेमध्ये दिवसाचा शेवट रोज पसायदानानंच व्हायचा. तेव्हा कधी एकदा हे पसायदान संपतंय आणि दप्तर घेऊन घराकडं पळतो, असं झालेलं असायचं. शाळा सुटण्याआधीची शेवटची पाच-दहा मिनिटंही काही तासांइतकी वाटायची आणि परवा तर चक्क असं वाटत होतं की पसायदान संपूच नये. पण मला वाटलं म्हणून तसं काही घडणार नव्हतं. पसायदान संपलं कार्यक्रमही संपला. आम्ही आपलं गाडी काढून घराची वाट पकडली. पण एक प्रश्‍न मी सतत मलाच विचारत होतो की, आज पसायदान ऐकताना अंगावर काटा का आला? हल्ली असं फार कमी वेळा होतं. एखादी घटना आपल्यासमोर घडते. एखादी चित्रविचित्र बातमी वाचयला मिळते. नातेवाईकांबद्दलची एखादी चांगली वाईट घटना कानावर पडते. पण आपण मात्र मन बोथट झाल्याप्रमाणं तिला सामोरं जातो. एखादी चांगली घटना घडली तर आनंदही होतो आणि एखादी वाईट गोष्ट कानावर पडली दुःखही होतं. पण हे सगळं अगदी वरवरून होतं. मनातील किंवा शरीरातील एखाद्या खोलवर असलेल्या बिंदूपासून आपल्याला वाईट वाटत नाही. त्यामुळं अंगावर काटाही येत नाही. या सगळ्याला चांगलंच सरसावलेलो असतो आपण.

गावांच शहर आणि शहरांच महानगर झाल्यापासून सगळं अगदी बदलून गेलेयं. घड्याळ्याच्या काट्यावर आधारित काटेकोर जीवनपद्धती स्वीकारल्यापासून उपजत भावना मरून गेल्या आहेत. आजूबाजूला कायं घडतंय, याबद्दल विचार करायला वेळ कुणाला आहे. घरातीलच एखादं काम करण्यासाठी हल्ली वेळ काढायला लागतो. हे चांगल की वाईट, हे कोणीच सांगू शकणार नाही. यातून मागेही फिरता येणार नाही. पण कधी कधी अंगावर काटा आला की आपण जिवंत असल्याचं जाणवतं. तिथून पुढं थोडावेळ मनात विचारांची गर्दीही होते. माझ्यासारखी काहीजण विचारांमधून निर्माण झालेल्या प्रश्‍नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतात तर काही मात्र प्रश्‍न पडण्याअगोदरच वेगळ्याच स्वप्नात रंगून जातात. मागं म्हटल्याप्रमाणं कोण बरोबर कोण चूक हे ठरवात येणार नाही आणि आपण ठरवूही नये. आपण बदललो आहोत किंवा बदलतो आहोत. एवढं जाणवलं तरी पुष्कळ झालं.

5 comments:

Abhijit Bathe said...

विश्वनाथ - सही लिहिलायस लेख!
मी पुणेकर असल्याने (आणि त्याबद्दल मला विशेष अभिमान नसुनही) ’फंडु’ झालाय लेख असं म्हणीन.
माझं मराठी वृत्तपत्रांचं वाचन जवळपास थांबलयच - त्यामुळे त्याबद्दल काही बोलता येणार नाही. पण मराठी ब्लॉग्ज मध्ये हे असं आणि अनुभवांबद्दल बोललं पाहिजे असं वाटतं.
जनता ’माझ्या आयुष्यात हे झालं - वाचा’ करते. कधिकधी ते मनोरंजकही असतं पण नेहमीच नाही.
’पसायदान’ ऐकुन अंगावर काटा आला. का आला याचा मी अजुन विचार करतोय - असा भन्नाट प्रसंग विरळाच वाचायला मिळतो.

बक अप!

कोहम said...

apan apala jagat java.......goshti badaltatach te nehamichach aahe.....pan mhanun apan navyatala nava andanda shodhayach....gamavalelyabaddal dukha kami karayacha evadhach...

HAREKRISHNAJI said...

how true

tAutomation said...

हा लेख खूपच छान लिहिला आहे . हा लेख अगदी मनापासून लिहल्याचे जाणवले...

AV
http://mianimazatv.blogspot.com/

Dnyaneshwar Ardad said...

छान लिहिलय सर.