Friday, October 26, 2007

साबूदाणा खिचडी आणि लखनवी चिकन!



अभिनेत्री अमृता सुभाष हिच्या खाण्याच्या आवडीनिवडी जाणून घेण्यासाठी मी नुकतीच तिची एक मुलाखत घेतली. ती इथे देत आहे. तुमच्या प्रतिक्रिया कळवा.
-------------------------

""पदार्थ बनविणाऱ्याच्या हाताला असलेली चव आणि त्याचं प्रेम यामुळेच तो पदार्थ जास्त चविष्ट होतो. पाककलेपेक्षा या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. त्यामुळेच आईच्या हातचं लखनवी चिकन आणि सासूबाईंनी केलेली आमटी आणि कढी या पदार्थांना असणारी चव दुसऱ्या कशालाच नाही...'' रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा सर्वच प्रांतांत कसदार अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री अमृता सुभाष तिच्या खाण्याच्या आवडीनिवडी "शेअर' करत होती. शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्ही प्रकारांत अमृताचे काही विशेष आवडीचे पदार्थ आहेत आणि ते मिळण्याची ठिकाणंही अगदी खासच. त्यात पुण्याच्या "कल्पना भेळ'पासून ते दिल्लीतील वेगवेगळ्या ढाब्यांवर मिळणाऱ्या शाही पनीरपर्यंतचा समावेश. या सगळ्यांमध्ये तिला सर्वांत जास्त आवडते, ती साबूदाण्याची खिचडी. खिचडीवर इतकं प्रेम, की तिला लहानपणी स्वप्नंही खिचडीचीच पडायची म्हणे! अमृता घरी येणार असल्याचं कळलं, की अजूनही तिचे नातलग आदल्या दिवशीच साबूदाणा भिजवून ठेवतात.

भेळ हा अमृताचा आणखी एक आवडीचा पदार्थ. "पुण्यातील "कल्पना', "पुष्करणी' आणि "गणेश' या ठिकाणी जशी भेळ मिळते, तशी भेळ जगात कुठंच मिळत नाही,' असं तिचं अगदी ठाम मत. त्यातही "कल्पना भेळे'ची आठवण निघाली की ती "नॉस्टॅल्जिक' होते आणि मग स. प. महाविद्यालयातील दिवस, तिच्या मित्रमैत्रिणी, कला मंडळचा ग्रुप या सगळ्या आठवणी ताज्या होतात. भेळीच्या गाडीवर कांदा, कोथिंबीर कापताना नुसतं बघितलं तरी अमृताच्या तोंडाला पाणी सुटतं. मुंबईत सगळं काही मिळत असलं तरी तिथं चांगली भेळ मिळत नाही, अशी तिची खंत. भविष्यात स्वतःची भेळेची गाडी सुरू करायला आवडेल, असंही ती गमतीत सांगते.

लखनवी चिकन, कोळंबी मसाला आणि माशांचे इतर सगळे खाद्यपदार्थ अमृताला विशेष प्रिय. कोळंबी मसाला स्वतः तयार करून घरच्यांना खाऊ घालणंही तिला आवडतं. त्यासाठी मुंबईत कोळंबी विकत घेण्याचं दुकानही ठरलेलं. मांसाहारी प्रकारातील सगळेच खाद्यपदार्थ करायला आणि खायला तिला आवडतात. पुण्यातील "पुरेपूर कोल्हापूर' हॉटेलमधील मांसाहारी थाळी आणि सोबत पांढऱ्या रश्‍शामुळं तोंडाला चव येते, असं अमृता सांगते.

आम्रखंड, सासूबाईंनी केलेले मोदक आणि गाजराचा हलवा हे अमृताच्या आवडीचे गोड पदार्थ. दिल्लीतील बंगाली मार्केटमध्ये मिळणारा "आलू की टिक्की' हा पदार्थ आणि सगळ्याच प्रकारचे पराठे यांचा एकदा तरी प्रत्येकानं आस्वाद घेतला पाहिजे, असं तिला वाटतं. एकूणच, वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणारी अमृता पक्की खवय्यीही आहे, असं तिच्याशी झालेल्या संवादातून जाणवत राहतं.

Friday, October 19, 2007

पालेभाज्यांच्या प्रेमात प्रशांत!


मराठी रंगभूमीवरील आघाडीचा अभिनेता प्रशांत दामले याच्या खाण्याच्या आवडीनिवडी जाणून घेण्यासाठी मी नुकतीच त्याची एक मुलाखत घेतली. त्यावर आधारित लेख सोबत देत आहे. तुम्हाला तो निश्‍चित आवडेल आणि तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया मला सांगाल, अशी अपेक्षा ठेवतो.

---------------

""मेथीच्या पिठ पेरून केलेल्या भाजीसोबत भाकरी, कांदा, लसणाची चटणी आणि तळलेली मिरची असा फक्कड बेत मला पंचपक्वानांपेक्षा जास्त आवडतो. पालेभाजी कोणतीही असो, अंबाडी, पालक, करडई, चवळी, तांदळी, राजगिरा मला आवडतेच. फक्त शेपूच आणि माझं वाकड आहे. शेपू खालं की घसरून पडल्यासारखं वाटतं...'' आजच्या घडीचा मराठी रंगभूमीवरील आघाडीचा अभिनेता प्रशांत दामले त्याच्या नेहमीच्या शैलीत बोलत होता. "आम्ही सारे खवय्ये' मालिकेतून प्रेक्षकांच्या "किचन'मध्ये पोचलेल्या प्रशांतला स्वतःला काय खायला आवडतं, हे अगदी दिलखुलासपणे तो सांगत होता. पालेभाज्यांवर प्रशांतच विशेष प्रेम असल्याचं त्याच्याशी बोलताना सातत्यानं जाणवतं. डाळ-तांदळाच्या कण्या घालून बायकोनं केलेली अंबाडीची भाजी प्रशांतला विशेष प्रिय.

रंगभूमीवर असताना अभिनयात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी दक्ष असलेल्या प्रशांतला घरी जेवतानाही सगळं साग्रसंगीतच लागतं. पानात भाजी कोणतीही असू दे पण त्यातले इनग्रेडियंट, मसाले अगदी कोंथिबीर-खोबऱ्यापासून ते आलं-लसणाच्या पेस्टपर्यंत सगळं अगदी प्रमाणात आणि परिपूर्ण हवं. त्याशिवाय जेवायला मजा येत नाही, असं त्याचं अगदी स्पष्ट मतं. कोणताही पदार्थ एक चमचा तेलातही होतो आणि चार चमचे तेलातही बनवता येतो. पण सध्या एक चमचा तेलात केलेले पदार्थ खाणं त्याला जास्त पसंत आहे. घरात आणि बाहेरही शाकाहरी जेवणच तो जास्त "प्रेफर' करतो.

दौऱ्यांच्या निमित्तानं त्याचं सतत बाहेरगावी जाणं होतं, अशावेळी शक्‍यतो तो ज्या हॉटेलवर उतरतो तिथेचं खातो. त्यामुळं पुण्यामध्ये असतानाही खाण्यासाठी हॉटेलमध्ये जाणं होत नाही. कधी वेळ आलीच तर गरमागरम उपमा आणि कडकडीत भूक लागली असेल तर उत्ताप्पा अशाच "डिशेस' खायला आवडतात. उत्ताप्प्यामुळं पोट भरल्यासारंख वाटत असल्याचं प्रशांत सांगतो. जिलेबी आणि आमरस या प्रशांतच्या "फेव्हरिट स्वीट डिश'. पुण्यात कोणाच्याही लग्नाला आलं की जिलेबीचा बेत असेल तर स्वारी खूष.

रंगभूमीवर किंवा चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका करणारा प्रशांत कधीकधी घरीही "शेफ'ची भूमिका बजावतो. फ्लॉवर, मटार, बटाटा, टोमॅटो घालून केलेला खास "प्रशांत स्टाईल कुर्मा' त्याच्या घरातील सगळ्यांनाच आवडतो. भविष्यात कधी स्वतःच हॉटेल काढलंच तर तिथं फक्त अस्सल महाराष्ट्रीयन आणि साऊथ इंडियन पदार्थच ठेवेन, पंजाबी जेवण आवडणाऱ्यांना तिथं "नो एंट्री' असेल, असं प्रशांत अगदी ठासून सांगतो.

सतत धावपळीच्या जीवनात काही गोष्टी तो अगदी कटाक्षानं पाळतो. सकाळचं जेवण अकरा वाजता घेऊनच घरातनं बाहेर पडतो. कुठही जेवताना कोशिंबीर पानात असलीच पाहिजे. सोबत तोंडाला चव येण्यासाठी लोणचं हवंच. कडकडीत भूक लागेपर्यंत काहीच खायचं नाही. या सगळ्या सवयींमुळंच प्रशांतन स्वतःला सतत "फिट' ठेवलयं.

--------------

Wednesday, October 10, 2007

आपण बदललो आहोत...

परवा संध्याकाळी एका कार्यक्रमाला गेलो होतो. सध्याच्या माध्यमांवर भाष्य करणारा कार्यक्रम असल्यानं त्याला पुणेकारांचा प्रतिसादही मोठा होता. पत्रकारितेत काम करणारी आणि या क्षेत्रात येऊ घातलेली पिढी आवर्जुन कार्यक्रमाला उपस्थित होती. अपेक्षेप्रमाणं कार्यक्रम रंगतदार झाला. प्रथेप्रमाणं काही पुणेकरांनी आवश्‍यक आणि अनावश्‍यक प्रश्‍नही विचारले. कार्यक्रमाचा शेवट पसायदानानं होणार असल्याचं आयोजकांनी आधीच जाहीर केलं होतं. त्याप्रमाणं प्रश्‍नोत्तरे आटोपल्यानंतर पसायदान सुरू झाले. सभागृहात उपस्थित असलेले सर्वजण प्रथेप्रमाणं उभे राहिले. मी ही उभा होतोच. तसं पसायदान माझ्यासाठी नवं नाही पण त्यादिवशी ते ऐकताना अचानक अंगावर काटा आला आणि लगेचच हे असं का होतंय, असा विचार मनात घोळू लागला.

शाळेमध्ये दिवसाचा शेवट रोज पसायदानानंच व्हायचा. तेव्हा कधी एकदा हे पसायदान संपतंय आणि दप्तर घेऊन घराकडं पळतो, असं झालेलं असायचं. शाळा सुटण्याआधीची शेवटची पाच-दहा मिनिटंही काही तासांइतकी वाटायची आणि परवा तर चक्क असं वाटत होतं की पसायदान संपूच नये. पण मला वाटलं म्हणून तसं काही घडणार नव्हतं. पसायदान संपलं कार्यक्रमही संपला. आम्ही आपलं गाडी काढून घराची वाट पकडली. पण एक प्रश्‍न मी सतत मलाच विचारत होतो की, आज पसायदान ऐकताना अंगावर काटा का आला? हल्ली असं फार कमी वेळा होतं. एखादी घटना आपल्यासमोर घडते. एखादी चित्रविचित्र बातमी वाचयला मिळते. नातेवाईकांबद्दलची एखादी चांगली वाईट घटना कानावर पडते. पण आपण मात्र मन बोथट झाल्याप्रमाणं तिला सामोरं जातो. एखादी चांगली घटना घडली तर आनंदही होतो आणि एखादी वाईट गोष्ट कानावर पडली दुःखही होतं. पण हे सगळं अगदी वरवरून होतं. मनातील किंवा शरीरातील एखाद्या खोलवर असलेल्या बिंदूपासून आपल्याला वाईट वाटत नाही. त्यामुळं अंगावर काटाही येत नाही. या सगळ्याला चांगलंच सरसावलेलो असतो आपण.

गावांच शहर आणि शहरांच महानगर झाल्यापासून सगळं अगदी बदलून गेलेयं. घड्याळ्याच्या काट्यावर आधारित काटेकोर जीवनपद्धती स्वीकारल्यापासून उपजत भावना मरून गेल्या आहेत. आजूबाजूला कायं घडतंय, याबद्दल विचार करायला वेळ कुणाला आहे. घरातीलच एखादं काम करण्यासाठी हल्ली वेळ काढायला लागतो. हे चांगल की वाईट, हे कोणीच सांगू शकणार नाही. यातून मागेही फिरता येणार नाही. पण कधी कधी अंगावर काटा आला की आपण जिवंत असल्याचं जाणवतं. तिथून पुढं थोडावेळ मनात विचारांची गर्दीही होते. माझ्यासारखी काहीजण विचारांमधून निर्माण झालेल्या प्रश्‍नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतात तर काही मात्र प्रश्‍न पडण्याअगोदरच वेगळ्याच स्वप्नात रंगून जातात. मागं म्हटल्याप्रमाणं कोण बरोबर कोण चूक हे ठरवात येणार नाही आणि आपण ठरवूही नये. आपण बदललो आहोत किंवा बदलतो आहोत. एवढं जाणवलं तरी पुष्कळ झालं.