खूप वर्षांनंतर परवा पुरुषोत्तम नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी पाहण्याचा योग आला. ऐन रविवारी भल्या पहाटे उठून नऊ वाजेपर्यंत "भरत'वर पोचायचं खरंतर जिवावर आलं होतं. तरीही प्राथमिक फेरीतील काही नाटकं पाहण्याचा योग आला आहे, तर कशाला दवडायचा म्हणून जायचं ठरवल. झालं रविवारी सकाळी आवरून-सावरून "भरत'वर पोचलो.
"भरत'वर आधीपासूनच सहभागी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं घोषणा युद्ध रंगल होतं. खरंतर पुरुषोत्तम स्पर्धा जितकी प्रसिद्ध तितकीच प्रसिद्धी या घोषणा युद्धाला मिळालीये. त्यातही दरवर्षी काही अतिउत्साही विद्यार्थी "डोकं' लढवून काही नवीन घोषणांची भर घालतात. आबासाहेब गरवारे कॉलेजचं "आता पास' आणि जयवंतराव सावंत कॉलेजचं "प्रेम जाड असंत' या एकांकिका त्या दिवशी सादर होणार होत्या.
"पुरुषोत्तम'चं एक बरं असतं. स्पर्धा असल्यामुळं सगळं कसं अगदी वेळेत सुरू होतं आणि वेळतं संपतं. बरोब्बर नऊच्या ठोक्याला आम्ही रंगमंदिरात दाखल झालो. तरीही विद्यार्थ्यांचं घोषणा युद्ध काही संपलं नव्हतं. इकडून गरवारे.... गरवारे...तर तिकडून गरवारे... घर जा रे....!
कधी एकेकाळी मी ही अशाच घोषणा देत होतो, याची आठवण होणं साहजिकच होतं. पण काय कोण जाणे त्यादिवशी मला त्या घोषणा नकोशा झाल्या होत्या. का ही मुलं बेंबीच्या देठापासून ओरडतायत. यांच्या घोषणांवर त्यांची एकांकिका अंतिम फेरीत जाणार नाही, हे यांना कळत नाही का? असा प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाला आणि त्याचवेळी हे सगळं मला इतकं का "इरिटेट' करतंय हे देखील समजेनासं झालं.
पलिकडे एकांकिका सुरू होती आणि इकडं माझ्या मनात वेगळ्याच विचारांनी "एन्ट्री' घेतली होती. कसे बदल असतात हे सगळे. माझं कॉलेज "लाईफ' संपून आठ-नऊ वर्षे झाली असतील. पण एवढ्यात किती बदल झालेत आपल्यात हे जाणवू लागलं.
खरंच कॉलेज "लाईफ' खूप वेगळं असतं. आपण काय करतोय, कशासाठी करतोय, त्याचा काही उपयोग होणार आहे का, याचा कोणताच विचार न करता केवळ मित्र म्हणाले म्हणून करायचं. मागचा-पुढचा कोणताच विचार न करता कोणतंही आव्हान स्वीकारायचं. पण जसजसं वय पुढे सरकतं तसतसा यामध्ये बदल होऊ लागतो. नुसतं काय करायचं, हाच प्रश्न नाही तर मग का करायचं, त्यातून मला किंवा आम्हाला काय फायदा होणार, किती वेळ जाणार असे प्रश्न मनात घोळू लागतात आणि इथंच सुरवात होते ती आयुष्यातील एका टप्प्याकडून दुसऱ्या टप्प्याकडं जाण्याची. प्रत्येकाच्या पातळीवर अगदी नकळतपणे हे बदल होत असतात. काहींना ते जाणवतात तर काहींना जाणवत नाही इतकचं.
खरंतर हे सगळंच खूप गमतीदार आहे, असं मला वाटतं. एकाच आयुष्यात अनेक "लाईफ' जगण्याची संधी मिळते. फक्त आपल्यात काहीतरी बदल होताहेत हे जाणवण्याइतकी संवेदनशीलता असली पाहिजे. माझ्यापुरतं बोलायचं तर अजून तिशी ओलांडली नसली, तरी तरुणपणाचा एक टप्पा संपलाय, हे मी ओळखलं. आता त्या टप्प्यातली मजा कदाचित वेळ व्यर्थ घालवण्यासारखी वाटेल. अजून काही वर्षांनी यामध्ये आणखी काही बदल झाले असतील. अव्याहतपणे हे सगळं चालूच राहील. आपण फक्त बघत राहायचं आणि बदल आनंदानं स्वीकारत जायचं.