Saturday, July 28, 2007

ब्रॉडशीट ते ब्लॉग



प्रवास... हा सर्वव्यापी, सर्वस्पर्शी शब्द. जन्मापासून मृत्यूपर्यंत, उमलण्यापासून कोमेजण्यापर्यंत निसर्गातील प्रत्येक घटकाचा प्रवास सुरू असतो. प्रवासात वेगवेगळे टप्पे येतात. काही वेळेला बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी स्वतःमध्ये तर काही वेळेला आव्हान स्वीकारून परिस्थितीमध्येही बदल करावा लागतो. या सर्व प्रक्रियेमध्ये नकळतपणे आपण स्वतःही काही शिकत असतो. व्यवहारी भाषेत त्यालाच 'अनुभव' म्हणतात. ब्रॉडशीट ते ब्लॉग हा असाच एक प्रवास.

ब्रॉडशीट हा शब्द मुद्रित किंवा छापील माध्यमाचे प्रतिनिधित्व करतो तर ब्लॉग हा तंत्रज्ञांनाधारित डिजिटल माध्यमाचा निदर्शक. ब्रॉडशीटपासून सुरू झालेला माध्यमांचा प्रवास आता ब्लॉगपर्यंत येऊन पोचला आहे. दरम्यानच्या काळात चॅनलनही आपलं बस्तान बसवलं आहेच. तसं बघायला गेलं तर ब्लॉग हा या प्रवासातील अंतिम टप्पा नाही. पण सध्यातरी हा प्रवास या टप्प्याभोवती रेंगाळला आहे. ब्रॉडशीट हे माध्यम अजून तरी आपल्याकडं प्रभावी आहेच. पण त्यालाही आता नवनवीन माध्यमांच्या सोबत आपला पुढचा प्रवास सुकर करावा लागणार, यात तिळमात्र शंका नाही.

माध्यम तुमच्या हातात

"मला काहीतरी सांगायचंय' हे वाक्‍य माध्यमनिर्मितीच्या आणि त्यांच्या विकासाच्या केंद्रस्थानी आहे. माझ्याकडं किंवा आमच्याकडं काहीतरी माहिती आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोचविणं गरजेचं आहे, हा केंद्रबिंदू ठेवूनच वृत्तपत्रांचा विकास होत गेला. गेल्या काही वर्षांपर्यंत तुम्हाला काही तरी सांगायचं असेल तर ते वृत्तपत्र, चॅनल चालविणाऱ्या संस्था, कंपन्यापर्यंत घेऊन जायला लागत होतं. तुमच्याकडे असलेली माहिती "बातमी' किंवा "लेख' या सदरात मोडणारी असली तरच ती त्यांच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोचू शकत होती. ब्लॉगमुळं मात्र, माझ्याकडं काहीतरी वेगळी माहिती आहे, मी काहीतरी वेगळा विचार केला आहे आणि मोठ्या प्रमाणावर तो मला कुणाला तरी सांगायचा आहे, यासाठी वृत्तपत्र किंवा चॅनल चालविणाऱ्या संस्थांवर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही. म्हणजेच एकप्रकारे माध्यमच तुमच्या हातात आलं आहे. आता या माध्यमाचा कसा वापर करायचा, हे तुम्हालाच ठरवायचं आहे किंबहुना आपण असंही म्हणू शकतो की, ब्लॉगचा तुम्ही कसा वापर करता यावरच या माध्यमाचं भवितव्य अवलंबून आहे.

वृत्तपत्र आणि चॅनल दोन्हींची ताकद

लेखी शब्द ही वृत्तपत्रांची तर व्हिज्युअल्स ही चॅनलची ताकद. वृत्तपत्रांपेक्षा चॅनलचा वेग आणि पोहोच जास्त, हे सुद्धा निर्विवाद सत्य. पण चॅनलच्या वाढत्यासंख्येमुळे भारताततरी वृत्तपत्रांच्या खपावर फार मोठा परिणाम झालेला दिसत नाही. उलट चॅनलच्या वाढत्याप्रसारामुळे वृत्तपत्रांमधील छायाचित्रांची संख्या आणि आकार निश्‍चित वाढला. आता ब्लॉग किंवा इटरनेट या तिसऱ्या माध्यमामध्ये वरील दोन्ही माध्यमांच्या एकत्रिकरणाची शक्ती आहे. तुम्हाला वाचण्याची आणि पाहण्याची किंवा ऐकण्याची सुविधा या माध्यमातून मिळते. त्यामुळे हे माध्यम वरील दोन्हींपेक्षा प्रभावी ठरणार, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. बरं दुसरी गोष्ट अशी की, ब्लॉग किंवा इंटरनेटचा विचार केला तर त्याची पोहोच ही वृत्तपत्र आणि चॅनल या दोन्हींपेक्षा जास्त. सातासमुद्रापार असलेल्या कोणत्याही देशातील कोणत्याही गावात, हव्या त्या वेळी तुम्ही तुम्हाला हवं ते वाचू शकता, हवं ते ऐकू शकता आणि हवं ते पाहू शकता. निवडीचे स्वातंत्र्य तुमच्याच हातात. तुम्हाला हवी ती वेबसाईट उघडा किंवा हवा तो ब्लॉग. आवडलं तर वाचा नाहीतर सोडून द्या. हे सगळं अगदी एका शब्दात सांगायचं झालं तर हे माध्यम अधिक "पर्सनलाईझ' आहे.

इंटरऍक्‍टिव्हिटी

इंटरनेट आणि इंटरऍक्‍टिव्हिटी या दोन्ही शब्दांमध्ये एकसमान धागा आहे. इंटरऍक्‍टिव्हिटी हा इंटरनेटचा प्राण आहे आणि इंटरनेट हा इंटरऍक्‍टिव्हिटीसाठी एंट्रीपॉईंट. "मी सांगतो तुम्ही ऐका' किंवा "मी लिहितो तुम्ही वाचा' याकडून आता "मी विचार मांडतो तुम्ही त्यात तुमच्या विचारांची भर घाला' याकडे प्रवास सुरू झाला आहे. हा प्रवास सुरू होण्यामधील महत्त्वाचा टप्पा म्हणजे इंटरनेट. तुम्ही म्हणाल इंटरनेट येण्याआधी इंटरऍक्‍टिव्हिटी नव्हती का? माझ्यामते होती. पण इतकी प्रभावी नव्हती जितकी इंटरनेटमुळं झाली आहे. आतापर्यंत आपल्यापुढं येणाऱ्या माहितीतून आपण स्वतः काहीतरी विचार करत होतोच. घरातल्यांबरोबर, नातेवाईंकाबरोबर, मित्रांबरोबर, ऑफिसमधल्या सहकाऱ्यांबरोबर त्यावर चर्चाही करत होतो. काहीजण त्यापुढे जाऊन माध्यमाच्या प्रतिनिधीकडं आपलं मत नोंदवित होते. इंटरनेटमुळं तुम्ही एखादी माहिती वाचल्याक्षणी तुमचं मत नोंदवू शकता. पुढच्या सेंकदाला तुमचं मत दुसरा कोणीतरी वाचू शकतो. लगचेच तिसरा कोणीतरी तुमच्या मतामध्ये किंवा माहितीमध्ये दुरुस्ती करू शकतो. असं हे चक्र दिवस-रात्र अव्याहतपणे चालू राहतं. तुम्हाला मत देण्यापलिकडे काहीतरी सांगायचं असेल तर ब्लॉग आहेच ना.
"शेअरिंग' ही या माध्यमाची आणखी एक ताकद. "मी काहीतरी चांगल पाहिलं आहे तुम्ही पण पाहा.' असं म्हणत तुम्ही एखादी गोष्ट शेअर करू शकता. तुमचा अनुभव, तुमचं यश, तुमचे निर्णय अगदी सगळं काही तुम्ही इतरांसोबत शेअर करू शकता. बरं शेअर करणाऱ्यांसाठीचा परिघही बराच व्यापक आहे. त्यातून तुम्ही तुमचं "नेटवर्क'ही उभारू शकता.

या सगळ्यातून पुढं काय होईल?

एक चांगलं वाक्‍य नुकतंच वाचनात आलं "In political life, an organised minority is always stronger than disorganised majority and organising is easier on the internet.' माझ्यामते, या वाक्‍याचा शेवट अतिशय महत्त्वाचा आहे. समानविचाराधारेच्या लोकांना एकत्रित करण्याचं, संघटित करण्याचं कार्य इंटरनेटमुळं सहज शक्‍य होऊ शकतं. ऑर्कुटवरील कम्युनिटीज हा त्याचाच एक अविष्कार. पाश्‍चिमात्य देशातील नागरिकांनी या माध्यमाला आपलंस करून टाकलं आहे. आपल्याकडंही हळूहळू का होईना, त्याचा प्रसार वाढतो आहे.
राजकीय पक्ष 2009मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत काही प्रमाणात आणि 2014 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत मोठ्याप्रमाणात इंटरनेटचा आपल्या प्रचारासाठी वापर करतील. त्याचवेळी कोणत्याही पक्षाशी संबंधित नसणारे पण कोणत्या पक्षाचे सरकार आल्यास देशाचं भलं होईल, असा विचार करणारे किंवा मागील सरकारच्या यशापयशाचा पाढा वाचणारे आपापल्या ब्लॉगच्या माध्यमातून राजकीय पक्षांच्या प्रचाराला पूरक किंवा मारक अशी भूमिका बजावतील. हळूहळू हे सगळं विधिमंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही झिरपत जाईल. केवळ मतदान करण्यापलिकडं आपली काहीतरी भूमिका असली पाहिजे आणि ती आपण इतरांपर्यंत पोचविली पाहिजे, याबद्दल समाजात जागृती होईल, असं मला वाटतं.
सर्व प्रकारच्या माध्यमांचे स्वरूप एकतर्फी संवादाचे न राहता दुतर्फी संवादाला चालना मिळेल. माझ्याकडे काही माहिती आहे. तुम्ही त्यामध्ये तुमच्या माहितीची, अनुभवांची भर घाला, असं काहीसं स्वरूप या संपूर्ण प्रक्रियेला येईल. माहितीचे आदान-प्रदान, त्याबद्दल व्यक्त झालेली मतं, मूळ माहितीमध्ये नव्याने पडलेली भर, सुधारित माहितीचे पुन्हा आदान-प्रदान असं हे चक्र सुरू राहील. एकूणच मूळ माहिती ही सतत अपडेट होत राहील.
ही प्रक्रिया घडत असताना व्यक्तिव्यक्तिंमधील संबंध, संपर्क तांत्रिक झाल्याने मनुष्य एकलकोंडा होण्याची शक्‍यताही आहे. दोन व्यक्तिंमधील प्रत्यक्ष संपर्क कमी झाला आणि केवळ तांत्रिक माध्यमातून संपर्क प्रस्थापित होऊ लागला तर त्याचा आवश्‍यक एकत्रित परिणाम साधला जाऊ न शकण्याची भीती आहेच.
माहिती फार वेगाने आपल्यापुढे येऊन आदळणार असल्यानं त्यातील काय लक्षात ठेवायचं आणि कोणत्या गोष्टीकडं कटाक्षानं दुर्लक्ष करायचं, याबद्दल आपली मतं तयार करून ठेवावी लागतील. आपल्यापुढे आलेल्या माहितीपैकी काय खरं आणि काय खोटं हे जोखण्यासाठी वैयक्तिक पातळीवर "स्कॅनिंग' करणं गरजेचं होणार आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वेगामुळं आपापल्या क्षेत्रात स्वतःला "अप-टू-डेट' ठेवणं ओघानं आलंच.

ब्रॉडशीट ते ब्लॉग या प्रवासात ब्लॉग किंवा इंटरनेटने घेतलेल्या भन्नाट एंट्रीविषयी सांगण्याचा हा एक प्रयत्न. मी अगोदर म्हटल्याप्रमाणं ब्लॉग किंवा इंटरनेट हे माध्यम आधीच्या दोन्हींपेक्षा प्रभावी आहे. पण त्याचे भवितव्य आपण त्याचा वापर कसा करतो, यावर अवलंबून आहे. शेवटी इतकेच सांगतो.

पेला अर्धा सरला आहे,
असं देखील म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे,
असं देखील म्हणता येतं
मग सरला आहे म्हणायचं,
की भरला आहे म्हणायचं,
तुम्हीच ठरवायचं.

(टीप - एवढं सगळ वाचल्यावर तुम्हाला निश्‍चितपणे माझ्या माहितीमध्ये काहीतरी भर घालावी, असं वाटल असणार. अहो मग वाट कसली पाहता? पाठवा तुमचे विचार आणि माहिती "कमेंट'च्या माध्यमातून माझ्यापर्यंत. हीच तर या माध्यमाची ताकद आहे.)

2 comments:

Devidas Deshpande said...

खूपसा वैचारिक असूनही बऱ्याच ओघवत्या शैलीत लिहिलं आहेस. एकूणात सुरवात छान झालीय. keep it up.
वृत्तपत्रे असोत की ब्लॉग, प्रत्येक माध्यम अधिकाधिक मोठी ताकद घेऊन येत आहे. मात्र त्यासोबत जबाबदारीही तेवढीच वाढते. अभिषेक-ऐश्वर्याने हनीमूनला कुठे जावे, म्हणून एसएमएसद्वारे प्रश्न विचारणारे आपले चॅनेल आणि त्याला भरभरून उत्तर पाठविणारे प्रेक्षक! तिकडे अमेरिकेत २००८ सालच्या अध्यक्षपदाचा प्रचार ‘यू
ट्यूब’ आणि ब्लॉगच्या माध्यमातून सुरू आहे. हा फरक दूर झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने माध्यमे लोकाभिमुख होणार नाहीत.

Le Gourmande said...

GOOD ONE BRO I LAW.....KEEP THE RIGHT SPIRIT TO EXPLORE YOUR VIEWS...GLOBALLY!!!